Latest NewsMaharashtra Politics

डिझेलसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या; साठेबाजीच्या तक्रारीनंतर पालकमंत्री संजय शिरसाटांची पेट्रोल पंपावर धाड

राज्यात इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडल्याने शेतीची कामे खोळंबली असून शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित पेट्रोल पंपावर अचानक धाड टाकली. तपासादरम्यान पंपावर डिझेल उपलब्ध असतानाही “साठा संपला” असा बनाव करण्यात आल्याचे उघड झाले. तब्बल तीन हजार लिटर डिझेलचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पालकमंत्री पंपावर पोहोचल्याची माहिती मिळताच संबंधित पंप चालक तेथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करताच पुन्हा डिझेल वितरण सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांनी आरोप केला की, डिझेल उपलब्ध असूनही त्यांना तासन्तास रांगेत उभे ठेवण्यात येत होते आणि साठ्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती.

दरम्यान, २२ मे २०२६ रोजीच्या इंधन साठा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा एकूण साठा २१ लाख ७८ हजार लिटर होता. त्यापैकी ६ लाख ६१ हजार लिटर विक्री झाली असून १५ लाख १७ हजार लिटर पेट्रोल उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ७ लाख ६५ हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये असल्याची माहिती आहे.

डिझेलबाबतही शहरात २५ लाख ८० हजार लिटर साठा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यातील १२ लाख ७२ हजार लिटर डिझेलची विक्री झाली असून सध्या १३ लाख ८ हजार लिटर डिझेल उपलब्ध आहे. आणखी १२ लाख ५५ हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “शेतकरी तासन् तास पंपावर उभे आहेत. काही जण तर भाकरी बांधून डिझेलसाठी आले आहेत. डिझेल नसल्याचा दावा केला जात असेल तर त्याचा अधिकृत पुरावा दाखवणे आवश्यक आहे. मात्र संबंधित पंप चालक साठ्याची माहिती न देता पळून गेला.” या प्रकरणानंतर प्रशासनाने संबंधित पेट्रोल पंपावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button