भाचीच्या छेडछाडीचा विरोध जीवावर बेतला! टिटवाळ्यात भररस्त्यात धारदार शस्त्राने युवकाची हत्या

कल्याणजवळील टिटवाळा परिसरात अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातून धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीची भरचौकात धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यातील म्हारळ गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची दीपक डांगे या तरुणाने छेड काढल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे मुलीच्या कुटुंबात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीचे मानलेले मामा रविंद्र उर्फ पिंट्या अहिरे यांनी मुलीच्या आईला आरोपीविरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
याच कारणावरून आरोपी दीपक डांगे आणि त्याच्या साथीदारांनी रविंद्र अहिरे यांच्याविरोधात सूडभावना बाळगल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री म्हारळ गावातील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे यांच्यावर तिघांनी अचानक हल्ला चढवला. आरोपींनी धारदार शस्त्रांनी डोक्यावर, पोटावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केले.
गंभीर जखमी अवस्थेत रविंद्र अहिरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी अल्पावधीतच दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रासह पूर्वीचे वाद आणि इतर कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या निर्घृण हत्येमुळे म्हारळ आणि टिटवाळा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.



