कर्नाटकात भीषण अपघात : ट्रक-क्रूझर समोरासमोर धडकले, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात शुक्रवारी (२२ मे) मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला असून या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ भरधाव ट्रक आणि क्रूझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. अपघात इतका गंभीर होता की क्रूझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
मृत सर्वजण चित्तापूर तालुक्यातील इंगळगी गावचे रहिवासी होते. टोलू पाशा (२७), महिबूब (४५), हुसेनी बुड़ान शाहा (४८), रसूल बी (४२) आणि फातिमा (३८) अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थही हळहळले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळगी गावातील एका आजारी नातेवाईकाला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीय रात्री उशिरा क्रूझर वाहनातून गावाकडे परतत होते. त्याचवेळी लाडलापूर गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर क्रूझर वाहन काही अंतर फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. वाहनाचा चक्काचूर झाल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काहींनी रुग्णालयात नेत असताना प्राण सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. ट्रकचा वेग, चालकाला डुलकी लागणे किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी होणाऱ्या रस्ता अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



