पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग! १० दिवसांत तिसरी दरवाढ; दिल्लीत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर

महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून, शनिवारी पुन्हा पेट्रोलमध्ये ८७ पैसे तर डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ जाहीर करण्यात आली. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनचालकांच्या खर्चात मोठी भर पडत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होत असलेले चढ-उतार, तसेच जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत असल्याचं चित्र आहे. तेल कंपन्यांवर वाढणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर थेट शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. याआधी ९८.६४ रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल आता ९९.५१ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली असून, ९१.५८ रुपयांवरून डिझेलचा दर ९२.४९ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोल आता अवघ्या ४९ पैशांनी १०० रुपयांपासून दूर आहे. दुसरीकडे, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोलचे दर आधीच शंभरी पार गेले आहेत. नव्या वाढीनंतर इंधन आणखी महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, शेती, किराणा आणि दैनंदिन वस्तूंच्या किंमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



