पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका, ट्रॅक्टर मशागतीचे वाढले दर, पेरणीपूर्वीच बळीराजाची वाढली चिंता

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका आता थेट बळीराजाला बसताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली असून पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे आधीच संकटात असलेल्या बळीराजासमोर आता मशागतीच्या खर्चाचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. सरकार यावर काय निर्णय घेते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेती कामासाठी वापरली जाणारी पारंपारिक बैलजोडी आता हळूहळू लुप्त होताना दिसत आहे. त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे आता शेती मशागतीचा खर्च वाढताना दिसत आहे.
सध्या पेट्रोलचा दर शंभर नऊ रुपये तर डिझेलचा दर शहाण्णव रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इंधन दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टर मालकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. काही भागात ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवणेही कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. नांगरणी व रोटाव्हेटर सारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र वाढत्या इंधन दरामुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या दरात एकरी शंभर रुपयांपर्यंत वाढ केल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत असल्याने त्याचा भार शेवटी शेतकऱ्यांवर पडत असल्याचे ट्रॅक्टर मालकांचे म्हणणे आहे.



