गोधणी टी-पॉईंटवर भरधाव कारचा भीषण अपघात; चार प्रवासी थोडक्यात बचावले

अमरावती जिल्ह्यातील गोधणी टी-पॉईंट परिसरात आज भरधाव कारचा भीषण अपघात घडला. चक्कीखापा रोडवर वेगात धावणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली उतरले. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील चारही प्रवासी सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत कारमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारासाठी मदत केली.
अपघातानंतर काही काळ चक्कीखापा रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.
स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वेगमर्यादेचे पालन न केल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे या मार्गावर वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि नियमित वाहतूक नियंत्रणासारख्या प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



