Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यातील म्हाडा कॉलनीचे रस्ते खड्ड्यांत; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

अमरावतीच्या बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण विकासकामांचे नाही, तर म्हाडा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था हे आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी या परिसरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यांत गेले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

म्हाडा कॉलनीतील अंतर्गत रस्ते जागोजागी उखडले गेले असून संपूर्ण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होते. रस्त्यांवर चिखलाचे दलदल तयार होत असल्याने पायी चालणेही कठीण बनते. वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दररोजचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, याच परिसरातील शिक्षक कॉलनीमध्ये फेवर ब्लॉक बसविणे आणि रस्त्यांची देखभाल करण्यात येत असताना म्हाडा कॉलनीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.

रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली असून लवकरात लवकर कामे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आता प्रशासन या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणार का, की नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button