citynewsLatest NewsMaharashtraWashim

एसटी बसमध्ये चढताना चोरीचा प्रयत्न; महिलांनीच चोरट्याला पकडून दिला चोप

मंगरूळपीर (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढताना चोरीचा प्रयत्न उधळून लावत महिलांनीच चोरट्याला रंगेहात पकडून चोप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून, सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळपीर बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने एका महिलेच्या लहान बाळाच्या हातातील चांदीचे कडे चोरण्याचा प्रयत्न केला.

मात्र बाळाच्या आईच्या सतर्कतेमुळे हा प्रकार तात्काळ उघड झाला. चोरीचा प्रयत्न लक्षात येताच आईने आरडाओरडा केला. तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेनेही तत्काळ धाव घेत चोरट्याला पकडून ठेवले.

संतापाच्या भरात दोन्ही महिलांनी त्या चोरट्याला चांगलाच चोप दिला. महिलांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे काही क्षण बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ही घटना घडत असताना बसस्थानक परिसरात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

नंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

गर्दीच्या ठिकाणी चोरटे किती सफाईने डाव साधतात, याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे. मात्र या घटनेत महिलांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.

सार्वजनिक ठिकाणी विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठांमध्ये पोलिसांची उपस्थिती आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत असणं किती गरजेचं आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button