citynewsLatest NewsMaharashtraWashim

पूल आहे… पण सुरक्षित आहे का? वाशिममधील रेल्वे उड्डाणपूल ठरतोय अपघातांचा सापळा

वाशिम : वाशिम शहरातून जाणाऱ्या पुसद–अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, अरुंद रस्ता, अंधार आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा पूल सध्या अपघातांचा सापळा बनला आहे.

चार ते पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा रेल्वे उड्डाणपूल विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असला, तरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत.

स्थानिकांच्या मते, हा पूल अत्यंत अरुंद असून दोन जड वाहनांना एकाच वेळी पूल पार करताना मोठी कसरत करावी लागते. समोरासमोर दोन ट्रक, बस किंवा अवजड वाहने आल्यास वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

याच अरुंद रस्त्यामुळे या पुलावर वारंवार किरकोळ ते गंभीर अपघात घडत असून, अनेक वेळा वाहनांची धडक होण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे हा पूल नागरिकांसाठी धोक्याचा ठरू लागला आहे.

या समस्येत भर म्हणजे, पुलावर अद्याप स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी संपूर्ण पुलावर अंधार पसरत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अंधारामुळे पुलावरील वळणं, समोरून येणारी वाहने आणि पादचारी वेळेवर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो. परिणामी रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणं अधिकच धोकादायक बनत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पूल रुंद करणे, दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे मजबूत करणे आणि तात्काळ स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

विकासाच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या या पुलावर मूलभूत सुरक्षेच्या सुविधांचाच अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती तातडीने लक्ष देतं आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करतं, हेच महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button