citynewsLatest NewsLocal NewsMaharashtraWashim

वाशिममध्ये मध्यरात्री धाडसी चोरी! सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं घर फोडून १७.३० लाखांचा ऐवज लंपास

कारंजा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात मध्यरात्री थरारक चोरीची धाडसी घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी थेट सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरालाच लक्ष्य करत तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे कारंजा शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा शहरातील मेमन कॉलनी परिसरात राहणारे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जमील रहीम शेख यांच्या घरात ही धाडसी चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराची कडी तोडून घरात प्रवेश केला.

यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटातील लॉकर फोडत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घरातील सदस्य शेजारच्या खोलीत झोपेत असतानाच चोरट्यांनी हा संपूर्ण डाव साधला. घरातील कुणालाही याची कुठलीही चाहूल लागली नाही. त्यामुळे या चोरीने परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची कसून मोहीम सुरू आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं घरही चोरट्यांनी फोडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.

आता या धाडसी चोरट्यांचा पोलिसांना किती लवकर माग काढता येतो, याकडे संपूर्ण कारंजा शहराचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button