उन्हाचा कहर, पाण्याचा दुष्काळ… वाशिमच्या जंगलात वन्यजीव पाण्यासाठी व्याकूळ!

कारंजा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून, उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यजीवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आता थेट मानवी वस्तींकडे वळू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ परिसरात काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबर्डा बाजार आणि सोमठाणा परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या जंगल पट्ट्यात काळवीट, हरिण, रानडुक्कर, ससे यांसह विविध वन्यप्राणी आणि पक्ष्यांची मोठी संख्या आढळते.
मात्र सध्या वाढत्या तापमानामुळे या भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यजीवांपुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, सोमठाणा वनक्षेत्रातील बीटमध्ये हातपंप असलेल्या दोन पाणवठ्यांसह एकूण १६ पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण वनक्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पाण्याअभावी वन्यप्राणी अक्षरशः कासावीस झाले असून, पाण्याच्या शोधात ते आता जंगलाबाहेर पडून मानवी वस्तीकडे वळत आहेत. यामुळे गावांच्या हद्दीत वन्यप्राण्यांची वर्दळ वाढू लागली असून, मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका अधिक तीव्र झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी वन विभागाने तातडीने पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे सुरू करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आणि बंद पडलेल्या पाणवठ्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाण्याअभावी वन्यजीवांचे जगणे कठीण बनले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाशिमच्या जंगलातील हा विदारक वास्तव वनव्यवस्थापनातील गंभीर दुर्लक्ष अधोरेखित करणारा असून, आता वन विभाग आणि प्रशासन या संकटाकडे किती वेगाने लक्ष देते, हेच निर्णायक ठरणार आहे.



