अमरावतीत प्रॉपर्टी वादातून थरारक खून! ६२ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या, २४ तासांत दोन्ही आरोपी जेरबंद

अमरावती : अमरावती शहरात प्रॉपर्टी वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २ मेच्या रात्री घडलेल्या या थरारक प्रकाराने संपूर्ण शहर हादरलं असून, नागपुरी गेट पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूर नगर येथील रहिवासी मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान (वय ६२) यांच्यावर छाया नगर परिसरात २ मेच्या रात्री धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रॉपर्टी वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मकसूद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींचा शोध घेण्यासाठी डीबी पथक तैनात करण्यात आलं.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक तपास आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत या खूनप्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद नाहिद मोहम्मद लुकमान (वय ४४, रा. सुफियान नगर) आणि अब्दुल सालेकिन अब्दुल सलीम (वय २८, रा. जाहेद नगर) यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून, प्रॉपर्टी वादातून वाढत चाललेली गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आली आहे. किरकोळ वादातून थेट जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
नागपुरी गेट पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हत्येमागील नेमकं कारण, पूर्वनियोजन आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.



