AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

महिला सशक्तीकरणाला नवी राजकीय दिशा! अमरावतीत ‘भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष’ची घोषणा

अमरावती : महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या लढ्याला आता नवी राजकीय दिशा मिळणार आहे. अमरावतीत महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात “भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष” स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

अमरावती शहरातील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाला राज्यभरातून महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महिला सशक्तीकरणाच्या चळवळीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, संघटनेच्या १४ वर्षांच्या सामाजिक कार्याला आता राजकीय व्यासपीठ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या १४ वर्षांपासून महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या महिला मुक्ती मोर्चा संघटनेने आपल्या सामाजिक चळवळीचा विस्तार करत आता औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचं औपचारिकरित्या पक्षात रूपांतर करण्यात आलं आणि “भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष” स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेला उपस्थित कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, दिलीप दादा गणोरकर तसेच संपादक विजय गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष अशोक खरात, प्रदेशाध्यक्ष संगीता वाघ तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात नेतृत्व घ्यावं, असा संदेश दिला. महिलांना केवळ चळवळीतच नव्हे तर निर्णय प्रक्रियेतही स्थान मिळालं पाहिजे, यावर यावेळी भर देण्यात आला.

गेल्या १४ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात महिला मुक्तीची ही चळवळ अधिक व्यापक आणि संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांच्या हक्कांसाठी संघटित शक्ती किती महत्त्वाची आहे, याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

महिला सशक्तीकरणाच्या चळवळीपासून थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलेला हा प्रवास आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.

आता नव्याने स्थापन झालेला “भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष” राज्याच्या राजकारणात नेमकी काय भूमिका बजावतो, महिला प्रश्नांवर किती प्रभावीपणे आवाज उठवतो आणि सामाजिक चळवळीला राजकीय बळ कितपत मिळवून देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button