अड्याळ बसस्थानकात ‘अंधारराज’! प्रवाशांची वर्दळ, पण सुरक्षेचा पूर्ण अभाव

पवनी (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावातील बसस्थानक सध्या अक्षरशः अंधारात बुडालं असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बसस्थानक परिसरात पथदिव्यांचा पूर्ण अभाव असून, विशेषतः रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना भीतीच्या छायेत प्रवास करावा लागत आहे.
अड्याळ बसस्थानक हे परिसरातील महत्त्वाचं वाहतूक केंद्र मानलं जातं. दररोज रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र बसस्थानक परिसरात प्रकाशव्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसरात भीषण अंधार पसरत आहे.
या अंधारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, विशेषतः महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळी बसची प्रतीक्षा करताना महिला आणि विद्यार्थिनींना भीतीच्या वातावरणात उभं राहावं लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
फक्त अंधारच नाही, तर बसस्थानकातील मूलभूत सुविधांचाही पूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. बसस्थानकावरील महिला आणि पुरुष मुतारीघरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाण्याची सुविधा नाही, प्रकाशाची सोय नाही, आणि अस्वच्छतेमुळे या सुविधा वापरणंही कठीण झालं आहे.
दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता या प्राथमिक गरजा असताना अड्याळ बसस्थानकातील ही अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, ग्रामपंचायत प्रशासन इतर कामांमध्ये व्यस्त राहून या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
नागरिकांनी तातडीने बसस्थानकात पथदिवे बसवणे, स्वच्छता मोहीम राबवणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सार्वजनिक वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या अड्याळ बसस्थानकाची ही अवस्था प्रशासनासाठी मोठा प्रश्न ठरत असून, आता ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणा यावर किती तातडीने उपाययोजना करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



