AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

जमिनीच्या वादातून अमरावतीत रक्तरंजित संघर्ष; मोठ्या भावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावाचा मृत्यू

नातं रक्ताचं… पण वाद जमिनीचा… आणि शेवट अत्यंत दुर्दैवी…
अमरावती शहरात शेतीच्या जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेला वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलला असून, या धक्कादायक घटनेत एका भावाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक भाऊ गंभीर जखमी झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत छाया नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या जमिनीच्या वादातून दोन भावांमध्ये जोरदार वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वादाने पेट घेतला आणि काही क्षणांतच तो हिंसक स्वरूपात बदलला.

या वादादरम्यान मोठा भाऊ अब्दुल तकसीम मोहम्मद लुकमान (वय ६०) याने आपल्या लहान भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान (वय ५७) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर कुटुंबातील सर्वात लहान भाऊ मोहम्मद नाजीम यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी अब्दुल तकसीम मोहम्मद लुकमान याला ताब्यात घेतले आहे.

मात्र, या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागपुरी गेट पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेतीच्या जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्येच रक्त सांडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. छोट्या वादातून एवढा मोठा अनर्थ घडल्याने नात्यांमधील संवाद आणि संयम किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. हिंसा कोणत्याही वादाचे उत्तर असू शकत नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button