हैबतपूरात संतापजनक प्रकार; ६५ वर्षीय महिलेचा विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी

गंगापूर तालुक्यातील हैबतपूर येथे ६५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी भागीरथीबाई (काल्पनिक नाव), वय ६५ वर्षे, या आपल्या घरासमोर उभ्या असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून हा वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या दरम्यान आरोपी रामभाऊ मोहन राठोड यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत तिच्या छातीला हात लावून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच इतर आरोपी भांबई रामभाऊ राठोड, प्रकाश रामभाऊ राठोड आणि मनिषा प्रकाश राठोड यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
यासोबतच “तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर २० एप्रिल रोजी फिर्यादीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



