citynewsLatest NewsLocal NewsMaharashtraWashim

पुसद नाक्यावर वाहतूक कोंडीचा कहर; सर्व्हिस रोडच्या कामामुळे शहर ठप्प, अँब्युलन्सही अडकली

वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या पुसद नाका चौकात आज चारी बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

पुसद नाका हा शहरातील महत्त्वाचा आणि नेहमीच गजबजलेला चौक मानला जातो. मात्र, सध्या सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे येथे वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास परिस्थिती इतकी बिघडली की चौकातील सर्व दिशांची वाहतूक थांबली. चारचाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसरात कोंडी निर्माण झाली.

उन्हाच्या कडक तापमानात वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या कोंडीत एक अँब्युलन्सही अडकली होती. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, सर्व्हिस रस्त्याच्या कामादरम्यान कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सध्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या या वाहतूक कोंडीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button