Chhatrapati Sambhaji NagarcitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

साई श्रद्धा पार्कमध्ये रक्तरंजित थरार; महिलेकडून महिलेची निर्घृण हत्या, परिसर हादरला

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्कमध्ये एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकू आणि पिस्तूलच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैलजा सोनार या सकाळच्या सुमारास साधना सोनपेठकर यांच्या घरी पोहोचल्या. त्या वेळी घरात साधना आणि त्यांच्या सासूबाई उपस्थित होत्या. घरात प्रवेश करताच शैलजाने आतून कडी लावली आणि सोबत आणलेल्या पिस्तुलाने साधना यांच्या कपाळावर रोख धरला.

मात्र, प्रसंगावधान राखत साधना यांच्या सासूबाईंनी धाडस दाखवत शैलजाच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले आणि ते खिडकीतून खाली फेकून दिले. या गोंधळात साधना या जीव वाचवण्यासाठी घरातील बेडरूममध्ये पळाल्या.

यानंतर संतापलेल्या शैलजा सोनार यांनी साधना यांच्या सासूबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सासूबाईंना वाचवण्यासाठी साधना पुन्हा हॉलमध्ये आल्या. त्याच वेळी शैलजाने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात साधना सोनपेठकर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी शैलजा सोनार यांना ताब्यात घेतले.

झटापटीदरम्यान आरोपी शैलजा किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, चाकू आणि इतर पुरावे जप्त केले असून तपास सुरू आहे.

दरम्यान, या हत्येमागे वैयक्तिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत साधना सोनपेठकर यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैलजा सोनार यांच्यात संबंध होते. यापूर्वी शैलजाने महेंद्र सोनपेठकर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हा हल्ला सूडाच्या भावनेतून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे साई श्रद्धा पार्क परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button