AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

“अमरावती भूषण पुरस्कार २०२६” सोहळा दिमाखात; ५० मान्यवरांचा भव्य सत्कार

अमरावतीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करणारा “अमरावती भूषण पुरस्कार २०२६” सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात तब्बल ५० मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अमरावतीच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोकसिंह चव्हाण, सुदर्शन जैन आणि सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतिया उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, महाराष्ट्र गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष श्वेतकुमार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. “गेल्या ३५ वर्षांपासून संस्था समाजउत्थानासाठी कार्यरत असून, समाजातील सुप्त प्रतिभेला व्यासपीठ देण्याचे कार्य सातत्याने करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुदर्शन जैन यांनी अमरावतीला लाभलेल्या संत-महंतांच्या परंपरेचा उल्लेख करत समाजासाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर डॉ. चंदू सोजतिया यांनी “पुरस्कार हा शेवट नसून नव्या कार्याची सुरुवात आहे,” असे प्रेरणादायी मत व्यक्त केले.

यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना “अमरावती भूषण पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. अमोल नरोटे, पोलीस सेवेसाठी संदीप चव्हाण, पत्रकारितेसाठी अनिल मुणोत आणि अमित तायडे, तसेच राजकारण क्षेत्रात अॅड. प्रीती रेवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, क्रीडा, कृषी, योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनाही पुरस्कार देण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गुलदेवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र गुलदेवकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

अमरावतीतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करत प्रेरणा देणारा हा सोहळा विशेष ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button