प्रधानमंत्री आवास मिळाले, पण पी.आर. कार्ड नाही! अमरावतीतील नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

अमरावती शहरातील वडाळी प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळूनही रहिवाशांना अद्याप पी.आर. कार्ड मिळाले नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
वडाळी प्रभाग क्रमांक ९ मधील महादेव खोरी, भारत नगर, देवी नगर आणि वडाळी पाणी टाकी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करून घरे मिळवली आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पी.आर. कार्ड न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
पी.आर. कार्ड नसल्याने घरांची मालमत्ता नोंदणी, विविध शासकीय योजनांचा लाभ, बँक कर्ज, तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये नागरिकांना वारंवार अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. “घर मिळालं, पण त्याचा अधिकृत पुरावा नसल्याने आम्ही अडचणीत आहोत,” अशी भावना अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.
नागरिकांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, वारंवार आश्वासनं मिळूनही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अखेर भाजपच्या वतीने हा मुद्दा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित करण्यात आला.
भाजपा जिल्हा शहर सचिव पंचफुला संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. निवेदनात पात्र लाभार्थ्यांना तातडीने पी.आर. कार्ड देण्याची आणि नागरिकांचा मूलभूत हक्काचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी किती लवकर निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



