हलाखीच्या परिस्थितीतून पोलीस दलापर्यंत! सानिया तडवीची जिद्द ठरली प्रेरणादायी

भोकरदन तालुक्यातील वाढोणा गावातून एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सानिया शौकत तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे वाढोणा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांकडून तिचा जल्लोषात सत्कार करण्यात आला.
सानिया तडवी ही वाढोणा गावातील असून, पुढील शिक्षणासाठी ती सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे मामाच्या घरी राहत होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिने शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडथळ्यांवर मात करत तिने पोलीस भरतीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले.
शिक्षणासोबतच सानियाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. नियमित अभ्यासाबरोबरच तिने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक सरावावरही विशेष भर दिला. रोजच्या कष्टातून आणि अथक मेहनतीतून अखेर तिने यश मिळवत जालना पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले.
सानियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. “आमच्या गावातील मुलीने एवढं मोठं यश मिळवलं, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सानिया ही जळकी बाजार येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन तडवी यांची भाची आहे. तिच्या यशाचा गौरव करत धावडा येथील पत्रकारांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार मुस्तफा पठाण, मजहर पठाण, राजू शाह, अजहर तडवी, मुजम्मिल पठाण, सादिक तडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सानियाचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, इतर युवक-युवतींनीही तिच्याकडून प्रेरणा घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
“अशक्य काहीच नसते, मनापासून प्रयत्न केले तर यश नक्की मिळते,” हे सानिया तडवीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस दलापर्यंत पोहोचलेली सानिया आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.



