citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात कट लागल्याच्या कारणावरून दोन युवकांवर जीवघेणा हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल

नागपूर शहरातील कपिल नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन युवकांवर चाकू आणि फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातील प्रल्हाद लॉनजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून काही युवकांनी दोन तरुणांना अडवले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र काही क्षणातच वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी दोघांवर हल्ला चढवला.

आरोपींनी चाकू तसेच परिसरात पडलेल्या फरशीचा वापर करून दोन्ही युवकांना बेदम मारहाण केली. हल्ला इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी युवकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेचा संपूर्ण प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये आरोपी युवकांना बेछूट मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे.

या घटनेमुळे कपिल नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

कपिल नगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button