एनजीओ संचालकावर तरुणींना धार्मिक दबाव टाकल्याचा आरोप; मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूरमध्ये एका एनजीओ संचालकाविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. स्लम परिसरातील मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या चार तरुणींनी मानकापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी रियाझ काझी याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
मानकापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तीन ते चार तरुणी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यांनी रियाझ काझी हा नमाज पठण करण्यासाठी तसेच मुस्लिम धर्माच्या इतर चालीरीती पाळण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित तरुणींवर धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करण्यात आले. तसेच त्यांना मानसिक त्रास देण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी सांगितले की, चार तरुणींच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित एनजीओ स्लम भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम करत असून, एका आठवड्यापूर्वी काम सोडून गेलेल्या एका मुलीच्या आईला फोन करूनही माहिती देण्यात आली होती.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तक्रारदार तरुणींचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच आरोपी रियाझ काझी याचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



