बार बंद केल्याचा राग; नागपुरात मॅनेजरवर काचेच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला, ७ आरोपींसह अल्पवयीन ताब्यात

नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात बार बंद केल्याच्या कारणावरून मॅनेजरवर काचेच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बारमधील मॅनेजर गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत ७ आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
हुडकेश्वर परिसरातील एस.के. बारमध्ये ही घटना घडली. तुषार वानखेडे हे या बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. रात्री उशिरा बार बंद झाल्यानंतर काही युवक बारमध्ये बसून दारू पिण्याचा आग्रह करत होते. मात्र, बार बंद झाल्याने तुषार वानखेडे यांनी त्यांना नकार दिला. याच कारणावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला.
यानंतर संबंधित युवकांनी आपल्या इतर मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. काही वेळातच ८ ते १० जणांचा जमाव बारमध्ये दाखल झाला. आरोपींपैकी एका युवकाने थेट काउंटरवरील काचेची बाटली उचलून तुषार वानखेडे यांच्या डोक्यावर सलग वार केले. या हल्ल्यात वानखेडे गंभीर जखमी झाले.
हल्ल्यादरम्यान बार मालकाचा मुलगा गितांशु करांगळे, तसेच मॅनेजर राजेश जयस्वाल आणि उत्तम सनेश्वर यांनाही मारहाण करण्यात आली. संतप्त आरोपींनी बारमधील १५ ते २० दारूच्या बाटल्या फोडल्या, तसेच काचेच्या खिडक्यांची तोडफोड केली. या प्रकारात सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. जखमी तुषार वानखेडे यांच्या जबाबावरून आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी संगनमत करून जीवघेणा हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात आणखी गंभीर कलमे लावली.
या प्रकरणात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या घटनेमुळे नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपींना अटक केल्याने पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली आहे.



