यवतमाळमध्ये गादी कारखान्याला भीषण आग; कापसाने घेतला पेट, परिसरात घबराट

यवतमाळ शहरातील गजबजलेल्या अप्सरा टॉकीज परिसरात आज एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रणरणत्या उन्हामुळे कारखान्यात साठवलेल्या कापसाने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण घर आणि कारखाना आपल्या विळख्यात घेतला.
अप्सरा टॉकीज परिसरात राहणारे अब्दुल नासिर अब्दुल कानोजे यांच्या घरातच गादी तयार करण्याचा कारखाना आहे. आज दुपारी अचानक कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच कापसाला आग लागली. विदर्भात सध्या तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले असून, याच तीव्र उष्णतेमुळे कापसाने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण घर व कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घरातील फर्निचर, गादी बनवण्याचे साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घरात गॅस सिलेंडर असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने, आग लागली त्यावेळी घरातील सर्व सदस्य वेळेत बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने नागरिकांना उष्णतेच्या काळात विशेष काळजी घेण्याचे, ज्वलनशील वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आणि घरात अग्निसुरक्षेची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.



