रीलच्या नादात समृद्धी महामार्गावर मृत्यूचा खेळ; बस कारवर पलटली, दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. रील बनवण्याच्या नादात एका खाजगी बसचा चालक नियंत्रण गमावल्याने बस थेट कारवर पलटली. या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईहून पुसदकडे जाणारी ‘बंजारा एक्सप्रेस’ ही खाजगी बस समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळील फरदापूर टोल नाक्याजवळ आली असताना हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा चालक आणि वाहक चालत्या बसमध्ये मोबाईलवर रील बनवत होते. गाण्यावर व्हिडिओ तयार करण्याच्या नादात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि काही क्षणांतच बस रस्त्यावरून घसरत एका कारवर पलटली.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत कारमधील दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर बस आणि कारमधील मिळून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, बसच्या चालकाच्या केबिनमध्ये नियमांचे उल्लंघन करत तब्बल ६ ते ७ प्रवासी बसवण्यात आले होते. त्यामुळे अपघातानंतर अनेकांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर चालक आणि क्लीनरने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. “अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळायला हवेत, पण रुग्णालयातही हलगर्जीपणा दिसून आला,” असा आरोप नातेवाईकांनी केला.
या घटनेनंतर रील बनवण्याच्या वाढत्या वेडावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या अशा प्रकारांना आता आळा बसणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, चालक आणि क्लीनरचा शोध घेतला जात आहे. तसेच, आरटीओ विभागाकडूनही या बसची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.



