Accident NewsChhatrapati Sambhaji NagarcitynewsLatest NewsMaharashtra

खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. खरात यांच्याशी संबंधित शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना त्यांच्या कारचा कंटेनरखाली घुसून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशोक खरात यांच्या अटकेनंतर शेळके मानसिक तणावात असल्याचेही सांगितले जात आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आहे. याआधी अनेकांनी अशोक खरात किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. आता ही घटना घडल्यामुळे त्या शंका अधिकच बळावल्या आहेत.”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, “शेळके यांच्या मृत्यूमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येण्याआधीच थांबतील की काय, अशी भीती वाटत आहे. माझ्याकडे याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही, मात्र या घटनेत घातपाताचा वास येत आहे.”

तसेच त्यांनी शिवनिका ट्रस्टमधील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि खरात प्रकरणातील वाढता तणाव लक्षात घेता, “आता केवळ जितेंद्र शेळकेच नव्हे, तर अशोक खरात आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे,” असेही नमूद केले.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, तो नेमका अपघात होता की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा शोध घेतला जात आहे. जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूमुळे अशोक खरात प्रकरणातील अनेक धागेदोरे आणि महत्त्वाच्या बाबी आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button