परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर प्यारे खान यांचा मोठा खुलासा; “समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

अमरावती | प्रतिनिधी
परतवाड्यातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्यारे खान म्हणाले की, परतवाडा, अचलपूर आणि अमरावती परिसरात समोर आलेल्या कथित लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ प्रकरणातील आतापर्यंत ओळख पटलेल्या सर्व पीडित मुली मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे “हिंदू मुलींना लक्ष्य केले” किंवा “लव्ह जिहाद” अशा पद्धतीने पसरवण्यात येत असलेल्या चर्चा आणि अफवा चुकीच्या असून त्या समाजात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने विशेष समिती नेमली होती. या समितीने परतवाडा, अचलपूर आणि अमरावती येथे भेट देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महिला व बालकल्याण विभाग तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. समितीच्या प्राथमिक अहवालात समाजात जाणीवपूर्वक अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्यारे खान यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागे आरोपी आयान अहमद आणि त्याचा मित्र उझैर खान यांच्यातील वाद कारणीभूत ठरला. आयान अहमद हा आपल्या कृत्यांचे व्हिडिओ उझैरकडे पाठवत होता. नंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, “कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित असले तरी समाजात अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, राज्य सरकारने ४७ सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या प्रकरणाशी संबंधित १०० हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत प्यारे खान यांनी एक महत्त्वाची बाबही मांडली. “या प्रकरणातील पीडित मुली अजूनही समोर येऊन जबाब देण्यास तयार नाहीत. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. पीडितांची ओळख गुप्त ठेवून त्यांना समुपदेशनाद्वारे पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेनंतर परतवाडा प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक वादाला आणखी धार मिळाली आहे. आता प्रशासन अफवांवर लगाम घालण्यात आणि प्रत्यक्ष तपास पुढे नेण्यात कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



