सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर अत्याचार; पतीनेच दिली साथ, खुलताबाद हादरले

खुलताबाद शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने तब्बल वर्षभर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या पतीने स्वतःच्या वडिलांचीच बाजू घेतल्याने त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. विवाहानंतर ती पती, सासू-सासरे आणि मुलांसोबत राहत होती. तिचा पती रात्रीच्या पाळीत नोकरी करत असल्याचा फायदा घेत, आरोपी सासरा तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितेने या प्रकाराला विरोध केला असता, तिला धमकावण्यात येत होते. संतापजनक बाब म्हणजे, तिने हा प्रकार आपल्या सासूला सांगितल्यानंतरही तिने “कोणाला काही सांगू नको, मी त्याला समजावते,” असे म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर पीडितेने आपल्या पतीकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, पतीने उलट वडिलांची बाजू घेत “वडील तुझी काळजी घेत आहेत,” असे सांगत तिच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर त्याने तिच्याशी संवाद कमी केला आणि सुमारे चार महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.
अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने हिंमत दाखवत खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासऱ्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, पतीवर सहआरोपी म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
“घरच्यांकडूनच विश्वासघात झाला, तर स्त्रीने न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.



