वाशिम तापलं! एप्रिलमध्येच ४३ अंशांचा तडाखा; उष्माघाताच्या रुग्णांत वाढ

वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून तापमान तब्बल ४३ अंशांच्या जवळ पोहोचले आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत.
जिल्ह्यात सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारी १२ नंतर बाहेर पडणेही अवघड झाले आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये नेहमीची गर्दी कमी झाली असून, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेमुळे त्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. डॉक्टरांच्या मते, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि शेतमजूर यांना या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेक जण डोक्यावर गमच्छा, स्कार्फ, रुमाल किंवा टोपी घालून बाहेर पडत आहेत. तसेच थंड पेय, पाणी, लिंबूपाणी, ताक आणि फळांचा रस यांची मागणी वाढली आहे.
डॉक्टरांनी नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके आणि सैल कपडे घालणे, तसेच उन्हात दीर्घकाळ काम टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसह वाशिममध्येही उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमान ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



