अमरावतीत महावीर जयंती उत्साहात; ‘अहिंसा परमो धर्म’च्या जयघोषाने दुमदुमले शहर

अमरावती : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक महोत्सव अमरावतीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘अहिंसा परमो धर्म’ आणि ‘जियो और जीने दो’ या संदेशांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
सराफा येथील श्वेतांबर जैन मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीत पांढऱ्या वेशभूषेत पुरुष वर्ग तर केशरी पारंपरिक पेहरावात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ढोल-ताशे, बँड पथक आणि आकर्षक झाक्यांमुळे शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
भाजी बाजार येथून निघालेली ही मिरवणूक गांधी चौक, राजकमल चौक मार्गे जयस्तंभ चौकापर्यंत पोहोचली. ‘अहिंसा परमो धर्म की जय’च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी दिवंगत पारसमलजी चोरडिया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जलसेवा केंद्र (पानपोई) सुरू करण्यात आले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शोभायात्रेच्या मार्गावर विविध जैन संस्थांकडून भाविकांसाठी शीतल पाणी, शीतपेये आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या निमित्ताने शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
एकूणच, अमरावतीत महावीर जयंती निमित्त भक्ती, एकोपा आणि मानवतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजही समाजासाठी तितकाच प्रेरणादायी ठरत आहे.



