citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरजवळ मेमू गाडी रुळावरून घसरली; जीवितहानी टळली, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

नागपूर : रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक पण तितकीच धक्कादायक घटना नागपूरजवळ घडली आहे. बालाघाटहून इतवारीकडे येणारी मेमू गाडी कळमना–कामठी दरम्यान रुळावरून घसरली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी प्रवासात असताना अचानक तिचे दोन चाक रुळावरून घसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. एसपीएआरएमई, अपघात निवारण ट्रेन (ART) आणि वैद्यकीय मदत पथक (ARME) घटनास्थळी रवाना करण्यात आले. काही मिनिटांतच ही पथके दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू झाले.

या अपघातामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. बिलासपूर–नागपूर, कोरबा–अमृतसर, हावडा–अहमदाबाद या गाड्यांना विलंब झाला, तर काही गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. तसेच नागपूर–गोंदिया, गोंदिया–दुर्ग आणि डोंगरगड–रायपूर या तीन स्थानिक मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या.

रेल्वे प्रशासनाने ‘पाइपलाईन’ तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घटनास्थळी तांत्रिक पथकाकडून रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या अपघातात जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button