पावसाळ्यापूर्वी मनपा अॅक्शन मोडमध्ये! आयुक्त वर्षा लड्डा रस्त्यावर; नाल्यांची केली प्रत्यक्ष पाहणी

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अमरावती महानगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात जलभरावाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः विविध भागांतील नाल्यांची पाहणी करत स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक आणि कचरा पाहून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने आयुक्त वर्षा लड्डा यांनी नमुना गल्ली, अंबानाला, भुतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर आणि मालवीय चौक परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिक कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू साचल्याचे निदर्शनास आले. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन शहरात जलभरावाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
ज्या ठिकाणी स्वच्छतेची कामे अपूर्ण आहेत किंवा अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच नाल्यांची वहनक्षमता वाढवून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाईल यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.
यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिक, हॉकर्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानधारकांना नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले. घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल तसेच बांधकाम साहित्य नाल्यांमध्ये टाकल्यामुळे पाणी तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर बनतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



