26 दिवसांनंतर उलगडलं गूढ! पाण्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह अब्दुल रियाज यांचाच; हत्येचा संशय कायम

अमरावती शहरात गेल्या 26 दिवसांपासून गूढ बनलेल्या एका अज्ञात मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बंद पडलेल्या डॉ. वझीर पटेल रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह 39 वर्षीय अब्दुल रियाज यांचाच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून शवविच्छेदन अहवालातील काही बाबींमुळे हत्येचा संशयही व्यक्त केला जात आहे.
13 मे 2026 रोजी अमरावतीतील बंद पडलेल्या डॉ. वझीर पटेल रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने त्याला लावारिस मृतदेह समजून हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते.
दरम्यान, नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला. तब्बल 26 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले.
तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अब्दुल रियाज असल्याचे समोर आले. ते काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहितीही पुढे आली. यानंतर पोलिसांनी मृताच्या आईचे आणि संशयित मृत व्यक्तीचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवले.
डीएनए चाचणीच्या अहवालातून मृतदेह अब्दुल रियाज यांचाच असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर मृताचे भाऊ रईसभाई यांनी प्रशासनाकडे मृतदेह इस्लामिक परंपरेनुसार दफन करण्याची मागणी केली.
पोलिस, महसूल विभाग आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत हिंदू स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मुस्लिम कब्रस्तानात धार्मिक विधी आणि इस्लामिक परंपरेनुसार त्यांचे पुन्हा दफन करण्यात आले.
मात्र या प्रकरणाला आणखी गंभीर वळण शवविच्छेदन अहवालामुळे मिळाले आहे. अहवालात मृताच्या पसलीवर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
अब्दुल रियाज यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला? आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आणि त्यांचे पथक करत आहे.



