कोणार्क कंपनीविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; अमरावतीची स्वच्छता व्यवस्था पुन्हा कोलमडली

वेळेवर पगार नसल्याचा आरोप; ईपीएफ-ईएसआयसीची माहितीही उपलब्ध नसल्याने कामगार संतप्त, अनेक भागांत कचऱ्याचे ढीग
अमरावती, प्रतिनिधी :
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी खासगी कंत्राटदाराकडे सोपवूनही नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईस्थित कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, अनेक वेळा मागणी करूनही त्यांना नियमित आणि वेळेवर वेतन दिले जात नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) संदर्भातील माहितीही त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनाचा थेट परिणाम शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर झाला आहे. कृष्णानगर परिसरातील अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्याने कचरा संकलनाची सेवा विस्कळीत झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील विविध भागांत स्वच्छता गाड्या नियमितपणे पोहोचत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
मोरबाग, विलासनगर, गवळीपुरा यासह अनेक वस्त्यांमध्ये कचरा उचलला गेला नसल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच एसटी डेपो आणि बसस्थानक परिसरातही कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
काही कर्मचारी कामावर उपस्थित असले तरी अनेक भागांमध्ये स्वच्छतेची कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महानगरपालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षित गांभीर्य दाखविले जात नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
कोट्यवधी रुपयांचे कंत्राट खासगी कंपनीला देऊनही शहराची स्वच्छता व्यवस्था सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत असल्याचा आरोप होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या, स्वच्छता व्यवस्थेतील अनियमितता आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन यावर कोणती ठोस भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे



