AmravatiLatest NewsSocial News

लोकशाही सक्षम करण्यासाठी ग्रामसभा प्रभावी होणे आवश्यक – डॉ. हर्षवर्धन देशमुख

विद्यापीठात संत गाडगेबाबांची दशसूत्रे व ग्रामविकासावर कार्यशाळेचे उद्घाटन

अमरावती – (दि. 23.03.2026) जर या देशाची लोकशाही सक्षम करायची असेल, तर ग्रामसभा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व उमजत नाही, तोपर्यंत ख­याअर्थाने ग्रामीण विकास साधला जाणार नाही, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी केले. ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे आणि ग्रामविकास’ या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरूजी, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, जेष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष श्री गजानन बोंडे, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना अध्यक्ष श्री राजेंद्र कराळे व संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी केली. ते पुढे म्हणाले, अधिकारांसोबत सरपंच व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव सुद्धा ठेवली पाहीजे, त्यामुळे सरपंचांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. ग्रामपंचायतीमध्ये होणारे सर्व व्यवहार आणि खर्च गावातील प्रत्येक नागरिकाला समजले पाहिजेत. कारभार पारदर्शक असला पाहीजे. फाळणी आणि निर्वासितांच्या प्रश्नांमुळे सुरुवातीच्या काळात ग्रामीण विकासाकडे पूर्णतः लक्ष देता आले नाही. 1957 मध्ये बळवंतराय मेहता समितीच्या शिफारसींनंतर आणि पुढे 1993 च्या 73 व्या घटनादुरुस्तीनंतर देशात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था ख­याअर्थाने लागू झाली. गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार ग्रामविकास करणे ही प्रत्येक पदाधिका­याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. सतिश तराळ म्हणाले, संत गाडगे बाबांनी समाजाला दिलेली दशसूत्री केवळ आध्यात्मिक उपदेश नसून तो ग्रामविकासाचा एक परिपूर्ण कृती आराखडा आहे. विज्ञानाची जोड देऊन या दशसूत्रीची अंमलबजावणी केल्यास गावे ख­याअर्थाने स्वयंपूर्ण होतील. दशसूत्रीतील प्रत्येक सूत्राचा आधुनिक ग्रामविकासाशी संबंध आहे. शिक्षण नसेल तर प्रगती खुंटते. बाबांनी रंजल्या-गांजल्यांसाठी शाळा आणि वसतिगृहे उभारली, कारण त्यांना माहित होते की, विचारांचे परिवर्तन शिक्षणाशिवाय शक्य नाही. केवळ परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वच्छता नव्हे, तर विचारांची स्वच्छता राखणे हे ग्रामविकासाचे पहिले पाऊल आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणा­या व्यसनाधिनतेवर प्रहार करताना, सरपंचांनी आपल्या गावातून व्यसनमुक्तीची चळवळ सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात आचार्य वेरूळकर म्हणाले, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री हा केवळ उपदेश नसून तो गाव सुखी आणि समृद्ध करण्याचा एक कृती आराखडा आहे. जोपर्यंत गावातील शेवटच्या माणसापर्यंत या दशसूत्रीचा लाभ पोहोचत नाही, तोपर्यंत ग्रामविकास अपूर्ण आहे. गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा मंत्र दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महारांनी ग्रामगीतेतून ग्रामविकासाठी संकल्पना मांडली. आजच्या सरपंचांनी आणि युवकांनी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता श्रमदानातून गावे स्वच्छ आणि सुंदर करावीत. दशसूत्रीतील प्रत्येक सूत्र ग्रामविकासासाठी महत्वाचे समजून त्यावर सरपंचांनी कामे करायला हवीत. विद्यापीठ जेव्हा अशा कार्यशाळा घेते, तेव्हा त्याचा उद्देश केवळ चर्चा करणे नसून, इथून जाणारा प्रत्येक प्रतिनिधी आपल्या गावात ‘गाडगे बाबा व राष्ट्रसंतांचे विचार’ प्रत्यक्ष राबवेल हा असावा. त्यांनी शिक्षण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देऊन ग्रामविकासाचे मॉडेल उभे करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांनी, तर श्री गजानन बोंडे यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका मांडली. संचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. कार्यशाळेला विदर्भातील सरपंच तसेच विद्यापीठाचे अधिकारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त झालेल्या प्रशासकाची जबाबदारी व भूमिका यावर सौ. लिनाताई तुरकर यांनी, तर शासकीय योजना राबवितांना येणा­या अडचणी यावर प्रा. राजेंद्र कराळे यांनी माहिती दिली. याप्रसंगी याचिकाकर्ते श्री अरविंद दळवी यांचा सत्कार व मार्गदर्शन तसेच अॅड. देवा पाचभाई व श्री अनिल उर्फ अण्णा पाटील यांनी उपस्थितांचे निराकरण केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button