अमरावतीत अवैध होर्डिंग्सचा सुळसुळाट; आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली? प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह

अमरावती शहरात प्रशासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही शहरभर अवैध होर्डिंग्सचा सुळसुळाट सुरूच आहे.
महानगरपालिकेच्या विविध झोनमध्ये अनियमिततेचा कळस गाठला गेला असून, मुख्य चौक, उड्डाणपूलाखालील जागा आणि अंतर्गत रस्त्यांवर बिनधास्तपणे बेकायदेशीर होर्डिंग्स उभारली जात आहेत. या होर्डिंग्समुळे शहराच्या सौंदर्याला तडा जात असून, वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याची टीका होत आहे. दरम्यान, शहरात सत्ता स्थापन होऊनही नगरसेवक स्वच्छता, नाले आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर पुढाकार घेताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
यामागे अधिकाऱ्यांचे ‘हात ओले’ होत असल्याची चर्चा रंगत असून, कारवाईदरम्यान काही नगरसेवकांकडून ‘आमचे माणसं आहेत’ असे फोन येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “हे अधिकारी दिवसभर नेमकं काय करतात?” असा सवाल विचारला जात आहे.
अवैध होर्डिंग्सचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी होणार का आणि या विद्रूपतेवर कधी आळा बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासाठी ही मोठी कसोटी ठरणार आहे.
सिटी न्यूज, अमरावती



