citynewsLatest NewsMaharashtraNanded

माहूर गडावर भक्तीचा महापूर; चैत्र नवरात्रानिमित्त हजारो भाविकांची गर्दी

नांदेड जिल्हा मधील पवित्र माहूर गड सध्या भक्तीने ओसंडून वाहत आहे. “श्री रेणुका माता की जय” च्या जयघोषात संपूर्ण गड दुमदुमून गेला असून गुढीपाडवा, चैत्र नवरात्र आणि रामनवमीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी येथे गर्दी केली आहे.

चैत्र नवरात्र महोत्सवात श्री रेणुका माता आणि श्री दत्तप्रभू यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

गॅस तुटवडा असतानाही येथे चुलीवर ठोकळे जाळून महाप्रसाद तयार केला जात असून भाविकांना तो प्रेमाने दिला जात आहे. पिण्यासाठी स्वच्छ फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे भाविक समाधान व्यक्त करत आहेत.

गडावर अन्नदान, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेत पंखे आणि कुलर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत भाविक शांततेत दर्शन घेत आहेत.

विश्वस्त मंडळाकडून दररोज मातेची आरती, महावस्त्र आणि अलंकार अर्पण पूजा केली जात आहे. तसेच कलाकारांसाठी उभारलेल्या सुसज्ज मंचावर भक्तिगीत, अभंग आणि भजनांचे सादरीकरण होत असून संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.

दरम्यान, लिफ्ट आणि स्कायवॉकचे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी भाविक भविष्यातील सोयींचा विचार करून सुमारे पाचशे पायऱ्या चढत आनंदाने दर्शन घेत आहेत. गडावरील दत्त शिखर आणि अनुसया माता संस्थान येथेही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली.

रामनवमीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

सध्या माहूर गडावर भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, अडचणी असूनही भाविकांचा उत्साह कायम आहे. “श्री रेणुका माता की जय” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button