अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा संताप; दारव्हा–कारंजा मार्गावरील टोल नाक्यावर तोडफोड

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा–कारंजा मार्गावर अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भुलाई–भांडेगाव टोल नाक्यावर संताप व्यक्त करत तोडफोड केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर अपूर्ण रस्त्यावरही टोल वसुली सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २ मार्च २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र निवेदनानंतरही टोल वसुली सुरूच राहिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा रोष वाढला आणि त्यांनी टोल नाक्यावरील काही साहित्याची तोडफोड केली.
या घटनेनंतर काही काळ टोल वसुली बंद ठेवण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापलेला दिसत आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते आणि पुढे आंदोलनाचे स्वरूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



