citynewsIndia NewsLatest NewsMaharashtra

नागपूर पोलिसांचा अभिनव उपक्रम; AI च्या मदतीने तक्रार नोंद प्रक्रिया झाली जलद

नागपूर शहर पोलिसांनी तक्रार नोंद प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परिमंडळ क्रमांक ४ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या मदतीने तक्रार नोंद आणि दैनंदिन नोंदी करण्याची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे तक्रारींची नोंद आता काही मिनिटांत होत आहे.


परिमंडळ क्रमांक ४ च्या पोलीस उपआयुक्त रश्मीता राव यांनी पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या दैनंदिन तक्रारींचा आढावा घेतला असता, तक्रारींची नोंद CCTNS प्रणालीमध्ये करण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले.

विशेषतः अदखलपात्र तक्रारी, मोबाईल मिसिंग, वस्तू हरवणे किंवा चोरीच्या तक्रारींची नोंद टंकलिखित करण्यासाठी साधारण ३० ते ६० मिनिटे लागत होती. त्यामुळे तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती.

ही समस्या सोडवण्यासाठी नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी Artificial Intelligence, Voice Typing आणि WhatsApp चा वापर करून एक सुलभ प्रणाली विकसित केली.

या प्रणालीमुळे तक्रार नोंद करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

उदाहरणार्थ –
अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यासाठी पूर्वी ३० मिनिटे लागत असताना आता फक्त २ ते ३ मिनिटे लागत आहेत.
चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी लागणारा १५ ते २० मिनिटांचा वेळ आता ३ ते ४ मिनिटांवर आला आहे.
तर मोबाईल मिसिंग तक्रार नोंदवण्यासाठी लागणारा २० ते २५ मिनिटांचा वेळही आता केवळ ३ ते ४ मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.

सुरुवातीला ही प्रणाली नंदनवन पोलीस ठाण्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली. त्यानंतर परिमंडळातील सक्करदरा, इमामवाडा, हुडकेश्वर, अजनी आणि वेलतरोडी या पोलीस ठाण्यांमध्येही ती लागू करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी एकूण १६५ महिला पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना CCTNS प्रणाली हाताळणे अधिक सोपे झाले असून त्यांच्या कामाच्या गतीतही वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे ही प्रणाली विकसित करण्यासाठी कोणतेही नवीन अॅप तयार करण्यात आलेले नाही आणि कोणताही अतिरिक्त खर्चही झाला नाही. उपलब्ध संगणकीय साधने, WhatsApp आणि AI च्या मदतीने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.

यामुळे पोलीस ठाण्यांचे कामकाज अधिक वेगवान आणि कार्यक्षम झाले असून नागरिकांनाही त्यांच्या तक्रारीची प्रत कमी वेळेत मिळू लागली आहे.


एकूणच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नागपूर पोलिसांनी प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. याचा फायदा पोलीस यंत्रणा आणि नागरिक दोघांनाही होत असल्याचे दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button