नांदगाव खंडेश्वरमध्ये संविधान विजय रॅली; संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त उत्साहात आयोजन

नांदगाव खंडेश्वर येथे संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य संविधान विजय रॅली उत्साहात पार पडली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत नागरिकांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे एकतावादी सामाजिक विचार मंचच्या वतीने संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य संविधान विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात ओंकारखेडा येथील बुद्ध विहारातून करण्यात आली. युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली आणि पद्मपाणी मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि धीरज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे सांगितले. संविधानामुळेच समाजात समता आणि बंधुतेची भावना अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक धीरज इंगोले आणि गौरव साबळे होते.
संविधानाचा गौरव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारी ही संविधान विजय रॅली नांदगाव खंडेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.



