महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक 2026 : भाजपकडून ४ उमेदवारांची घोषणा, नव्या चेहऱ्यांना संधी

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देत सातत्य राखले असून विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
यंदा अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असतानाही भाजपने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील समीकरणे स्पष्ट
राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार महायुतीकडे ६ जागा तर महाविकास आघाडीकडे १ जागा जाण्याची शक्यता आहे.
महायुतीतील वाटपानुसार ६ पैकी ४ जागा भाजपकडे, १ जागा शिंदेसेनेकडे आणि १ जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे, तर शिंदेसेनेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.
दिग्गजांचा पत्ता कट
भाजपकडून राज्यसभेसाठी सुमारे १० जणांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांसारख्या नेत्यांची नावे आघाडीवर होती. मात्र अंतिम यादीत त्यांना संधी मिळालेली नाही.
निवडणूक कार्यक्रम
- २६ फेब्रुवारी – अधिसूचना जारी
- ५ मार्च – उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- ६ मार्च – अर्जांची छाननी
- ९ मार्च – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
- १६ मार्च – सकाळी ९ ते सायंकाळी ४ मतदान
- सायंकाळी ५ – मतमोजणी सुरू
- २० मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण
राजकीय वर्तुळात या उमेदवारीमुळे नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, येत्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



