स्वस्तिक प्रभागात हिंदू एकतेचा भव्य जागर; शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वस्तिक प्रभाग, प्रतिनिधी :
स्वस्तिक प्रभागात काल आयोजित करण्यात आलेल्या हिंदू सम्मेलनाने परिसरात भक्ती, परंपरा आणि राष्ट्रभावनेचे वातावरण निर्माण केले. शेकडो महिला, पुरुष आणि लहानग्यांच्या उत्स्फूर्त सहभागात हा भव्य सोहळा पार पडला.
हिंदू सम्मेलनाची सुरुवात नवाथे येथील विठ्ठल मंदिरातून भव्य रॅलीने झाली. दिंडी बँडच्या तालावर महिला-पुरुष, युवक आणि बालकांनी “भारत माता की जय”, “जय श्री राम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली रविकिरण कॉलनीतील राम मंदिरात दाखल झाली.
मंदिर परिसरात भारत माता पूजन आणि गौमाता पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. धार्मिक वातावरणात उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
यावेळी महंत श्री मोहन दास महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात धर्म, संस्कृती आणि समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जैन मुनि श्री वैद्य साहेब यांनी प्रवचनातून सदाचार, अहिंसा आणि संस्कारांचे संदेश देत समाज प्रबोधन केले.
कार्यक्रमात शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. विशेषतः महिला, युवक आणि बालकांचा उत्साह लक्षवेधी ठरला. संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिंदू संस्कृतीचे जतन आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याचा संदेश या सम्मेलनातून देण्यात आला.
स्वस्तिक प्रभागातील या हिंदू सम्मेलनाने भक्ती, संस्कृती आणि एकतेचा संदेश देत नागरिकांना एकत्र आणले. अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



