‘टोलचे पैसे परत करा!’ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ३२ तासांच्या कोंडीवरून राज ठाकरे कडाडले; सरकारला विचारले बोचरे प्रश्न

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३२ तासांच्या महाभयंकर वाहतूक कोंडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “या काळात प्रवाशांकडून जो टोल वसूल केला गेला, तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे,” अशी आक्रमक मागणी राज यांनी केली आहे.
मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर हा मार्ग गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत ठप्प होता. या ६२ किलोमीटर लांब रांगा आणि प्रवाशांचे झालेले हाल पाहून राज ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
चौकशीचा फार्स कशासाठी?
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नेहमीप्रमाणे सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण अशा कितीतरी चौकश्या होतात, त्यातून सरकार किंवा प्रशासन नक्की काय बोध घेते? हाच खरा प्रश्न आहे.”
‘फक्त टोल वसुलीतच तत्परता’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून हा मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्षे झाली. मात्र, या काळात आपत्ती व्यवस्थापनाचा कोणताही कृती आराखडा तयार केला गेला नाही, अशी टीका राज यांनी केली. “या २४ वर्षांत एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे:
- टोल परत करा: ३२ तास रस्ता बंद असूनही प्रवाशांकडून टोल घेतला गेला, तो तात्काळ परत करावा.
- हायस्पीड ट्रेन नंतर, रस्ता आधी सुधारा: अर्थसंकल्पात हायस्पीड ट्रेनच्या घोषणा केल्या जातात, पण त्याआधी रस्ते प्रवास सुरळीत करा.
- कोडगेपणा अनाकलनीय: मुंबई-पुणे ही विकासाची इंजिनं असताना ३२ तास वाहतूक ठप्प होणे आणि प्रशासन शांत बसणे हा कोडगेपणा आहे.
- पालकमंत्री असूनही नागरिक निराधार: सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होतात, पण नागरिकांना मात्र संकटाच्या वेळी निराधार वाटावे लागते.



