Latest NewsMaharashtra Politics
Budget 2026: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! CNG २-३ रुपयांनी स्वस्त होणार, तर EV बॅटरीच्या किमतीही घटणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. विशेषतः सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) वापरणाऱ्यांसाठी ही बजेट मोठी खुशखबर घेऊन आले आहे. बायोगॅस आणि लिथियम-आयन बॅटरीवरील कर सवलतीमुळे इंधन आणि वाहनांच्या किमती कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
CNG आता होणार स्वस्त; नेमके कारण काय?
सरकारने बायोगॅस-मिश्रित सीएनजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बायोगॅसवर उत्पादन शुल्कात (Excise Duty) पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
- किमतीत घट: तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे सीएनजीच्या दरात प्रति किलो २ ते ३ रुपयांची कपात होऊ शकते.
- कसा होईल फायदा? सध्या नियमित सीएनजीवर १४ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाते. आता बायोगॅसचे मूल्य वगळल्याने एकूण कर कमी होईल. बायोगॅसचे मिश्रण जेवढे जास्त, तितका सीएनजी स्वस्त मिळेल.
इलेक्ट्रिक वाहने (EV) घेणाऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण
इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात महागडा घटक म्हणजे त्याची ‘बॅटरी’. अर्थमंत्र्यांनी बॅटरी स्वस्त करण्यासाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत:
- सीमाशुल्क सूट (Customs Duty): लिथियम-आयन सेल उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीवर मिळणारी सीमाशुल्क सूट आता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) साठीही लागू असेल. यामुळे बॅटरी निर्मितीचा खर्च कमी होईल.
- दुर्मिळ खनिज कॉरिडॉर: केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर तयार केला जाईल. ईव्ही मोटर्स आणि बॅटरीसाठी लागणारी ही खनिजे आता देशातच उत्पादित होतील, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
इतर महत्त्वाच्या घोषणा
- PM E-DRIVE योजना: या योजनेसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ईव्ही चार्जिंग आणि पेमेंटसाठी लवकरच एक ‘सुपर अॅप’ लाँच केले जाणार आहे.
- PLI स्कीमचा विस्तार: ऑटो कंपोनंट्ससाठीच्या पीएलआय (PLI) योजनेची व्याप्ती वाढवून ती ५४९० कोटींपर्यंत नेली आहे, ज्यामुळे देशांतर्गत वाहन निर्मितीला वेग येईल.



