Crime NewsLatest NewsNagpur

ऑपरेशन थंडर अंतर्गत आंतरराज्य गांजा तस्करीचा पर्दाफाशमानकापूर पोलिसांची मोठी कारवाई; २९ किलो गांजा जप्त, चार आरोपी अटकेत

नागपूर

नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंतरराज्य गांजा तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उडीसा राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २९ किलो १०० ग्रॅम गांजा व १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागपूर शहरातील अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

८ जानेवारी रोजी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरस चौक परिसरात नुपूर वाईन शॉपसमोर बीट मार्शल व सीआर पेट्रोलिंग पथक गस्त घालत असताना निसान सनी कंपनीची पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीतील स्टेपनी ठेवण्याच्या जागेत लोखंडी टिन वेल्डिंग करून गांजा लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

छन्नी व हातोड्याच्या सहाय्याने वेल्डिंग तोडल्यानंतर १५ प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला ओलसर हिरवट-काळसर गांजा आढळून आला. या गांजाचे एकूण वजन २९ किलो १०० ग्रॅम असून बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख ८२ हजार रुपये आहे. हा गांजा कमर्शियल क्वान्टिटीमध्ये येत असल्याने एनडीपीएस कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी
१) बलराम धाना बुरडी (वय २३),
२) प्रदीपकुमार श्यामसुंदर दास (वय ५०),
३) सुरेंद्र धनराज पुजारी (वय १८),
४) जतीन मदन खिल्लो (वय २२)
या चार आरोपींना अटक केली असून ते सर्व उडीसा राज्यातील कोरापुट जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

कारवाईदरम्यान गांजा, निसान सनी कार, विविध मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १२ लाख २ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपींना १५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

उडीसाहून आणलेला हा गांजा मानकापूर परिसरात नेमका कोणाला पुरविला जाणार होता, तसेच या मागे आणखी कोणते आरोपी आहेत का, याचा सखोल तपास मानकापूर पोलीस करत आहेत. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button