अमरावती महापालिका निवडणूक : नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण; आंबा गेट झोनमध्ये वादाचे प्रसंग

अमरावती :
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. शुक्रवार हा नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती.
आंबा गेट झोन क्रमांक ५ येथे दुपारी तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विवेकानंद काळकर यांनी अधिकृत घोषणा करत नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. या प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांकडून पत्रभारतीसंदर्भात आक्षेप घेण्यात आल्याने वादाचे प्रसंग निर्माण झाले. पत्रभारतीच्या मुद्द्यावरून उमेदवार आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, अपक्ष उमेदवार करण डेडवाल यांनी आपला नामांकन अर्ज अधिकृतपणे मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्याची नोंद घेण्यात आली.
नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होणार असून, येत्या काळात प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.



