agricultureLatest NewsMaharashtra

मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक : ‘अनघा लक्ष्मी ऍग्रो प्रोड्युसर’ कंपनीवर गंभीर आरोप

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील काडीकचरा खरेदी करून त्यापासून जैव इंधन (बायो-फ्युएल) तयार करण्याचे आमिष दाखवत ‘अनघा लक्ष्मी ऍग्रो प्रोड्युसर’ कंपनीने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने मुदखेड तालुक्यातील सुमारे ५० गावांमधील शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये सदस्य नोंदणी शुल्क घेतले. मात्र, अनेक महिने उलटूनही कंपनीकडून कोणताही जैव इंधन प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ खानसोळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत कंपनीचे चेअरमन उद्धव पवार निवघेकर यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले.

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी डॉ. अमरज्योती गच्छे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनघा लक्ष्मी ऍग्रो प्रोड्युसर’ या कंपनीची कृषी विभागाकडे कोणतीही अधिकृत नोंद नाही. त्यामुळे ही कंपनी अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करत होती का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कंपनीचे चेअरमन राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्ती असल्यामुळेच प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात आणि संबंधितांवर कारवाई होते की राजकीय दबावामुळे प्रकरण दडपले जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button