नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज – ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले जाणार

अमरावती, 31 डिसेंबर 2025:
थर्टी फर्स्टचा जल्लोष सुरक्षिततेत आणि शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आज रात्री पोलीस दल ‘ऑन रोड’ राहणार असून, गैरप्रकार रोखण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवण्यात येणार आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
विशेष खबरदारी:
- जिल्ह्यातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग, हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट्स तसेच महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
- पोलीस पथके रात्री उशिरापर्यंत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत गस्त घालणार आहेत.
- दारू पिऊन वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्ट्या, ध्वनीप्रदूषण, रस्त्यावर धिंगाणा, महिलांची छेडछाड, हाणामारी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नियमांचे पालन करावे, शांततेत नववर्षाचे स्वागत करावे आणि कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा.
पोलिसांचा संदेश:
एकीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह, तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी.
थर्टी फर्स्टच्या रात्री जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहे.
नियम पाळा, सुरक्षित रहा आणि आनंदात नववर्षाचे स्वागत करा – हाच पोलीसांचा संदेश आहे.



