AmravatielectionLatest News

अमरावती महापालिका निवडणूक: नामनिर्देशन प्रक्रियेला वेग

पाचव्या दिवशी 316 अर्जांची उचल, 25 उमेदवारांचे अर्ज दाखल

अमरावती | प्रतिनिधी

नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज उचलण्याची प्रक्रिया पाचव्या दिवशीही जोमात सुरू असून, 27 डिसेंबर रोजी मोठी हालचाल पाहायला मिळाली.

महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला 23 डिसेंबर रोजी अधिकृत सुरुवात झाली होती. शहरातील सातही झोन कार्यालयांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढताना दिसत आहे. 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 316 नामनिर्देशन अर्जांची उचल करण्यात आली असून, 25 उमेदवारांनी प्रत्यक्ष आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपासह सर्व प्रमुख राजकीय पक्ष, आघाड्या तसेच अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, आगामी दिवसांत उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असल्याने पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी झोन कार्यालयांमध्ये आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली असून, प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

पुढील तीन दिवसांत वाढणार राजकीय हालचाली

एकूणच अमरावती महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून, अंतिम मुदतीपर्यंत राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबरनंतरच नेमके कोणते उमेदवार निवडणूक मैदानात उतरतात, हे स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button